लग्नाच्या 12 दिवसानंतर नववधूचा कोरोनामुळं मृत्यू, लग्नाच्या जोडयातच वधूवर अंत्यसंस्कार

लखीमपूर : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचे संकट अत्यंत भीषण आहे. अनेक जवळची माणसे दगावत आहेत. त्यातच आता एक नवं दाम्पत्य कोरोनाच्या विळख्यात सापडले. अवघ्या 12 दिवसांतच संसार अर्ध्यावर सोडून नववधूचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या तिचा नवरा मृत्यूशी झुंज देत आहे.

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील रहिवासी असलेल्या दाम्पत्यावर हे संकट कोसळले. 30 एप्रिलला शोभित आणि रुबी यांचे लग्न झाले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा आणि बायको दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रुबीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, लग्नाच्या अवघ्या 12 व्या दिवशीच तिने जीव सोडला. लग्नाच्या जोड्यातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर नवऱ्याची अवस्था अद्यापही गंभीर आहे.

1 मेला शोभितने रूबीला घरी आणले. सासरी पोहोचल्यानंतर रूबीला अतिताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर शोभित आणि त्याच्या घरच्यांनी रूबीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 10 दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

पत्नीची काळजी घेताना पतीही आजारी

रूबी आजारी पडल्यापासून शोभितने रुग्णालयातून बाहेर गेला नाही. दिवसरात्र तो तिची सेवा करत होता. त्यामुळे त्यालाही ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. स्वत:ची काळजी न घेतल्याने शोभितही आजारी पडला. दरम्यान, रूबीला औषध आणि ऑक्सिजन वेळेवर मिळाला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.