पाठवणीच्या वेळी वधू इतकी रडली की आला हृदयविकाराचा झटका; वधूचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लग्नानंतर निरोप घेताना वधूने रडणे हि सामान्य बाब आहे. पण, ओडिशामध्ये अशीच एक दुःखद घटना घडल्याचे समोर आले आहे. यात वधूचा मृत्यू झाला आहे. नुकतीच विवाहाच्या वेळी रडण्यामुळे नवविवाहित वधूचा मृत्यू झाला. यामुळे उत्सवाचे रूपांतर दु:खात झाले. असे सांगितले जात आहे की, सतत रडण्यामुळे वधूला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना सोनेपूर जिल्ह्यातील असून वधूचे नाव गुप्तेश्वरी साहू उर्फ रोझी असे आहे.

एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, रोझी साहूचे शुक्रवारी बालानगीर येथील राहणारे बिसिकिसन यांच्याशी होत होते. तिच्या लग्नानंतर रोझीच्या कुटुंबीयांनी तिला निरोप देण्याची तयारी दर्शविली. हे पाहून ती आणखी रडू लागली. वधू इतकी रडत होती की ती रडून रडून बेशुद्ध झाली आणि जमिनीवर कोसळली.

रोझी जमिनीवर बेहोश झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी तिच्या हाताला मालिश करून आणि तिच्या चेहर्‍यावर पाणी शिंपडून तिला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा तिला उठविण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा वधूला तातडीने डंगुरीपल्ली सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोस्टमार्टमनंतर मुलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जुल्लुंडा गावच्या रहिवाशाने सांगितले की, रोझीचे वडील यांचे काही काळापूर्वी निधन झाले होते, त्यानंतर ती खूप तणावात होती. रोझीला लग्नासाठी काही समाजसेवकांनी सहकार्य केले होते. तसेच याच समाजसेवकांनी तिच्या लग्नाचे आयोजन देखील केले होते.