ठग वधू : होणाऱ्या नवऱ्याच्या पैशांनी 6 लाखांची शॉपिंग… नंतर फरार झाली ‘शोना’ ‘बाबू’ ‘पिल्लू’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनौमध्ये लग्नाच्या आधी एका वधूने होणाऱ्या नवऱ्याला लाखो रुपयांचा चुना लावला आणि रफूचक्कर झाली. या तरुणाचे 16 डिसेंबर रोजी लग्न होणार होते, परंतु त्याआधीच मुलीने त्याला लुटले आणि फरार झाली. वास्तविक मनोज अग्रवाल नावाच्या तरुणाची मेट्रोमोनियल वेबसाइट जीवन साथी डॉट कॉमच्या माध्यमातून एका मुलीशी ओळख झाली होती आणि त्यानंतर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले.

लखनौ येथील रहिवासी मनोज अग्रवालने लग्नासाठी जीवन साथी डॉट कॉमवर त्याची प्रोफाइल तयार केली होती. दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी त्याला प्रियंका सिंह नावाच्या मुलीची रिक्वेस्ट मिळाली, त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. मनोजच्या म्हणण्यानुसार, मुलीने त्याला सांगितले की ती बिहारची असून तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आहे. ती मावशीसोबत राहते आणि दिल्ली येथे शिकते.

कथितपणे मनोजच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि प्रियंकाच्या मावशीने बोलणी केली आणि त्यांचे लग्न जमवले. या दरम्यान या तरुणीने मनोजला सांगितले की ती आयएएस (UPSC) ची तयारी करत आहे आणि लवकरच तिची निवड देखील होईल. मनोजच्या म्हणण्यानुसार, त्याच बहाण्याने तरुणी पैसे मागू लागली. मनोजने सांगितले की, तरुणी अभ्यासासाठी कधी 10 हजार कधी 20 हजार आणि कधी 50 हजार रुपयांची मागणी करत राहिली आणि ती होणारी पत्नी आहे म्हणून मी पैसे देत गेलो. अशा प्रकारे त्या तरुणाने घर बांधण्यासाठी जमा केलेले सुमारे 6 लाख रुपये त्या तरुणीला दिले.

मागील 6 महिन्यांपासून दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग होत होती आणि दोघांचे भेटणे देखील सुरू होते. दरम्यान, लग्नाची तारीख 16 डिसेंबर निश्चित करण्यात आली. यामुळे तरुण खूप आनंदित झाला आणि त्याने लग्नाची तयारी सुरू केली. फरार होणारी तरुणी जेव्हा मनोजला भेटण्यासाठी लखनौला पोहोचली तेव्हा मनोजनेच तिच्या येण्या-जाण्याच्या फ्लाइटचे भाडे दिले. इतकेच नाही तर मनोजने मॉलमध्ये तिला सुमारे 2 लाख रुपयांची शॉपिंग देखील करून दिली. यानंतर, कथितपणे आरोपी प्रियंका सिंह शेवटच्या वेळी हैदराबादला जाण्याचे सांगून मनोजला चुना लावून फरार झाली. तरुणी गायब झाल्यानंतर तिचाच नव्हे तर तिच्या मावशीचा फोनही बंद येऊ लागला. मनोजने जेव्हा प्रियंकाने दिलेले आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदार कार्डची चौकशी केली तेव्हा तेही बनावट निघाले.

आरोपी प्रियंकाने दिलेल्या पत्त्यावर बिहार आणि दिल्ली येथे जेव्हा मनोजने चौकशी केली तेव्हा तेही बनावट निघाले, त्यानंतर पीडित तरुणाला फसवणूक झाल्याचे समजले. लग्नाआधीच प्रियंका नावाच्या मुलीने मनोजला लुटले होते आणि ती फरार झाली होती. यानंतर पीडित मनोजने तरुणीवर हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.