नवर्‍याला लग्नाच्या वाढदिवसाचा केला ‘मॅसेज ‘अन् गायब झाली पत्नी

सिंधुदुर्ग :  पोलीसनामा ऑनलाईन –   मालवण रेवतळे येथील सौ. काव्या कृष्णा माजीक हिने आपल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मॅसेज केला आणि बेपत्ता झाली. दरम्यान बेपत्ता होऊन चार दिवस झाले तरीही अजून या विवाहितेचा तपास लागत नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अजून वाढत आहे. सौ. काव्या हीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

सौ. काव्या ही मालवण ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या कृष्णा माजीक यांची पत्नी आहे. ८ एप्रिल रोजी काव्या ही सकाळी मालवण रॉक गार्डनच्या समुद्र किनाऱ्यावरून बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. काव्याने तिच्या पतीला काल सकाळी साडे नऊच्या सुमारास लग्नाच्या वाढदिवसाचा मॅसेज करून शुभेच्छा दिल्या आणि नंतर बेपत्ता झाली.

मालवण रॉक गार्डनच्या समुद्र किनाऱ्यावर काव्याची ओढणी, पर्स, मोबाईल अशा वस्तू सापडल्या आहेत. काव्या बेपत्ता असल्याची माहिती पती कृष्णा माजीक यांनी पोलीस स्थानकात दिली. दरम्यान तिचा आजूबाजूच्या परिसरात आणि इतरत्र शोध घेण्यात आला, परंतु चार दिवस लोटले तरीही काव्याचा अजून तपास लागत नाही. त्यामुळे तिच्या बेपत्ता होण्यामागील कारण काय असेल याची माहिती अद्याप तरी उघडकीस झालेली नाही.