पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टिकटॉकस्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते व माजी वनमंत्री यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मात्र हे प्रकरण दिवसेंदिवस धक्कादायक वळण घेत आहे. आता पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. यामुळे घोगरे यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पूजाचा लॅपटॉप आणून द्या अशी मागणी नोटीसद्वारे पोलिसांनी केली आहे.
वानवडी येथे पूजा चव्हाणचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. त्यावेळी नगरसेवक घोगरे घटनास्थळी उपस्थित होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल असल्याची चर्चा आहे. याच पुराव्याच्या जोरावर भाजपकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे देखील बोलले जात आहे. आता मात्र घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप असल्याचा थेट संशय पुणे पोलिसांना आहे. मात्र पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे घोगरे यांनी स्पष्ट केले आहे. घोगरे यांच्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर घोगरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.