भाजप नगरसेवक धनराज घोगरेंना पुणे पोलिसांकडून नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आज अखेर वेगळ्या वळणावर आले असून, भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर पुणे पोलिसांनी संशय घेत त्यांना लॅपटॉप आणून देण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांच्या नोटीसमुळे मात्र खळबळ उडाली आहे.

परळीच्या 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण हिचे फोटो आणि क्लिप बाहेर पडत असल्याने त्या नेमक्या येतात कुठून असा प्रश्न पोलीस आणि नागरिकांना पडला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जात असून, तिचा लॅपटॉप चोरला असल्याची तक्रार नुकतीच शिवसेनेच्या बीड जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण यांनी केली होती. त्यात त्यांनी पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांचे नाव घेतले होते. त्यांनी या आरोपाचे खंडन करत याप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. पण आज पुणे पोलिसांनी पूजा आत्महत्या प्रकरणात थेट धनराज घोगरे यांना नोटीस पाठवली आहे. आम्हाला संशय आहे, लॅपटॉप तुमच्याकडे आहे. तो आपण आणून द्यावा, असे म्हटले आहे. त्यामुळे नवा वाद तर पेटण्याची चिन्हे आहेतच पण राजकारणदेखील चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.