संजय राऊतांचा उदयनराजेंवर ‘प्रतिहल्ला’, म्हणाले – ‘शिवरायांचे ‘वंशज’ असल्याचे ‘पुरावे’ घेऊन या’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का ? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिला होता. यावर प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान त्यांनी उदयनराजेंना दिले आहे. आज पुण्यात एका कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी उदयनराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत, भाजपचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. मात्र, एखादा महापुरुष सर्वांचा असतो. देवी देवतांची पुजा करताना त्याला कोणी विचारायला जात नाही. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करतो. शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा नतमस्तक होतो. शरद पवारांना देण्यात आलेली जाणता राजा ही उपाधी योग्य असल्याचे राऊत यांनी सांगितले. ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे त्याच प्रमाणे शरद पवार यांना जनतेने जाणता राजा ही उपाधी दिली आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. राजा लुटमार करणारा नसतो. रक्षण करणारा राजा असतो. शिवरायांवर कोणाचाही मालकी हक्क असू शकत नाही. जो या देशात, राज्यात शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी आणि कष्टकऱ्यांसाठी काम करतो तोच जाणता राजा असतो, त्यामुळे यावर कोणीही आक्षेप घेण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/