मतदानाच्या अगोदर ४८ तास प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातीवर बंदी घालावी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मतदानाच्या ४८ तास आधी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि न्यूज पोर्टल इत्यादी माध्यमात होणाऱ्या निवडणूक प्रचारावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. अशा मागणीची सूचना केंद्रीय विधी मंत्रालयाला निवडणूक आयोगाने केली आहे.

आचरसंहिते नुसार निवडणूक प्रचार हा मतदान सुरु होण्याच्या ४८ तास अगोदर संपवण्यात यावा अशी सक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात तरतूद १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यात करण्यात आली आहे. सेक्शन १२६ (२) अंतर्गत निवडणूक आयोगाने बंदी घालण्याची मागणी केंद्रीय विधी मंत्रालयाला केली आहे.

१३ फेब्रुवारीला लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जरी केली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला बंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेक्शन १२६ नुसार निवडणुकीच्या मतदानाआधी सभा,रॅली आणि इलेट्रॉनिक माध्यमावर प्रचार करण्यास बंदी घातली आहे. त्याच प्रमाणे सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि न्यूज पोर्टल इत्यादी माध्यमात प्रचार करण्यास बंदी घालावी अशी मागणी निवडणूक आयोगाने केली आहे.