‘हे’ पक्ष करत आहेत हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून दिशाभूल : शरद पवार

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन – राम मंदिराचा मुद्दा पुन्हा-पुन्हा काढला तर लोकांचा विश्वास बसणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा आणि शिवसेना करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इतकंच नाही तर सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून मराठा आरक्षणाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत होईल, असे दिवास्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघत आहेत. मात्र या भूलथापांना जनता फसणार नाही, असा टोला  शरद पवार यांनी लगावला आहे.

कोल्हापुरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. देशाच्या संरक्षणासंबंधी देशाबाहेरील शक्तींना प्रोत्साहित करणे हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही, असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर ही निशाणा साधला आहे. लवकरच  येणाऱ्या चार राज्यातील निवडणुकांमध्ये लोकांचा कल समोर येईल असेही ते म्हणाले. एवढेच नाही तर सरकार विरोधात नागरिकांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे आणि चार राज्याच्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येईल असेही ते म्हणाले.

‘राहुल गांधी कायमच शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आणतात परंतु त्यांनी कधी शेतात बैल जुंपलेत का ?’

भाजप विरोधी गटांना एकत्र आणायचा प्रयत्न

ज्या राज्यात जो पक्ष मोठा आहे, त्यांनी भाजप विरोधात नेतृत्व केले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं शक्य होईल. देशपातळीवर एक आघाडी करतोय हे खरं नाही पण राज्या राज्यात सत्ताधारी भाजप विरोधी गटांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय, असे पवार म्हणालेत. निवडणूक आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा काढला जात आहे. भाजपकडे साडेचार वर्षात सांगण्यासारखं काही नाही, म्हणून काँग्रेसमधील एका घराण्यावर टीका करत आहेत तर दुसरीकडे धर्माचा आधार घेऊन राजकारण करत आहेत. त्यामुळे 10 डिसेंबर रोजी सगळे विरोधी पक्ष पुन्हा एकदा दिल्लीत एकत्र बसणार आहोत, असेही ते म्हणाले.

जम्मू काश्मीरचे उदाहरण हे सरकारचे घातक उदाहरण आहे. राज्यपालांची सरकार बनवायला संधी देण्याची जबाबदारी होती, मात्र सरकार बरखास्त केले. याचा निषेध करत मोदींनी घेतलेला हा स्वार्थीपणाचा निर्णय घातक आहे, असे पवार म्हणाले.