विकिलिक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजला पन्नास आठवड्यांचा तुरुंगवास

लंडन : वृत्तसंस्था – अमेरिकेसह अनेक देशांची गोपनीय आणि राजकीय कागदपत्रे उघड करणाऱ्या विकिलिक्स चा संस्थापक ज्युलियन असांज याला लंडनच्या इक्वेडोर दूतावासातून ब्रिटन पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५० आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

साऊथवर्क क्राऊन कोर्टात असांजच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र त्याला ५० आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून त्यानंतरच जामीन अर्जावर विचार करण्यात येईल असे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ?

‘विकिलिक्स’चा संस्थापक ज्युलियन असांज याला लंडनमधील इक्वेडोर दूतावासातून ब्रिटनच्या पोलिसांनी एप्रिल महिन्यात अटक केली. अमेरिकेसह अनेक देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून असांज याने खळबळ उडवून दिली होती. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ज्युलियन असांज याच्या अटकेला दुजोरा दिला होता . स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटनमधील जामीन शर्तीचे उल्लंघन केल्याच्या २९ जून २०१२च्या प्रकरणात असांज याला अटक केली.

ऑस्ट्रेलियात जन्मलेला ज्युलियन असांज (४७) हा गेली ७ वर्षे मध्य लंडनमधील इक्वेडोर दूतावासात राहात होता. स्वीडनमधील लैंगिक हल्ला प्रकरणातील अटक टाळण्यासाठी त्याने इक्वेडोर देशाच्या येथील दूतावासात आसरा घेतला होता. सदर खटला मागे घेण्यात आला होता. मात्र जामिनाचे उल्लंघन केल्या प्रकरणी स्कॉटलंड यार्डचे पोलीस त्याच्या मागावर होते.

आपल्याला अमेरिकेत प्रत्यार्पित केले जाईल आणि तेथे अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे उघड केल्याबद्दल फाशी होईल, असा दावा करून असांज याने इक्वेडोर दूतावासात जून २०१२पासून आश्रय मिळविला होता. इक्वेडोर सरकारने असांज याला आश्रय देण्यास नकार दिल्यावर दूतावासाच्या राजनैतिक सुरक्षित क्षेत्रातून बाहेर पडल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ब्रिटनच्या सरकारने असांज याच्या अटकेचे स्वागत केले आहे. ब्रिटन आणि इक्वेडोर यांच्यातील संवादामुळे हे शक्य झाले, असे ब्रिटनने सांगितले.

इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी असांज याने वारंवार आंतरराष्ट्रीय करार आणि दैनंदिन जीवनात प्रोटोकोल यांचे उल्लंघन केल्यामुळे त्याचा आश्रय काढून घेत असल्याचे सांगितले होते. असांज आणि इक्वेडोर यांचे संबंध गेल्या आक्टोबरपासून ताणले गेले होते. त्याला नवे नियम लागू करून मर्यादित इंटरनेट सुविधा इक्वेडोरने देऊ केली होती. डिसेंबर २०१७ मध्ये असांज याला इक्वेडेरने नागरिकत्व दिले. त्याला रशियातील राजनैतिक पदावर पाठविण्याचे इक्वेडोरने ठरविले होते. मात्र दूतावास सोडल्यावर त्याला अटक करू, असे ब्रिटनने बजावले होते.