राजभवन परिसरात सापडलं ब्रिटीशकालीन मोठं भुयार

मुंबई : वृत्तसंस्था – मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने महत्वाचा असलेल्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील राज्यपालांच्या निवासस्थानाखाली एक ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. हे भुयार तब्बल १५ हजार चौरस फुट असून हे भुयार राजभवनाच्या आवारात आढळून आले आहे.

भुयाराची रचना
राजभवन परिसरात सापडलेल्या भुयारात १३ कक्ष सापडले आहेत. लहान, मोठे आकाराच्या या खोल्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण असून या कक्षांना शेल स्टोअर, गन शेल, काडतूस भंडार आणि शेल लिफ्ट अशी नावे देण्यात आलेली आहेत.

असा लागला शोध
राजभवनाच्या परिसरात असलेल्या हिरवळीच्या खाली तीन वर्षापूर्वी राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या आदेशावरून भुयाराचा शोध घेण्यात आला. यापूर्वी या ठिकाणी भुयार असल्याची चर्चा होती. ही चर्चा ऐकल्यानंतर सी. विद्यासागर यांनी जुन्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन या ठिकाणी खोदकाम सुरु केले. खोदकाम सुरु असताना हे भुयार आढळून आले. ब्रिटीशकालीन भुयार असल्याने याचे जतन करण्याचे आदेश राज्यपालांनी सरकारला दिले. सतत पाणी झिरपत असल्याने हे भुयार कमकुवत झाले होते. मात्र, आता याची डागडुजी करण्यात आली आहे.

भुयाराची वैशिष्ट्ये
हे भुयार सुमारे सव्वाशे वर्ष जुने आहे. त्याकाळी ब्रिटीशांनी पाण्याचा निचरा होण्याची सोय या भुयारात केल्याचे दिसून येत आहे. तसेच नैसर्गिक प्रकाश आणि शुद्ध हवा मिळावी यासाठी खास सोय देखील याठिकाणी करण्यात आली आहे. भुयार सापडले त्यावेळी या ठिकाणच्या खोल्यांना लष्करी सामग्रीची नावे देण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे हे ठिकाण ब्रिटीशांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे स्पष्ट होते.

सर्वसामान्यांसाठी भुयार खुले होणार
ब्रिटीशकालीन भुयार सापडल्याने त्याचे जतन करण्यात येत आहे. या ठिकाणी संग्राहलय तयार करण्यात आले आहे. मात्र, हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. परंतु, राज्यसरकार ते सर्वांसाठी खुले करणार असून यासाठी ऑनलाइन आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त