झाडूमुळं पसरू शकतो ‘कोरोना’, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांनी कोरोना विषाणूविषयी मोठा खुलासा केला आहे. डॉक्टर म्हणतात की झाडूमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो. म्हणून, 2 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या स्वच्छता दिनी झाडू ऐवजी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर अधिक करावा.

एम्सच्या डॉक्टरांनी सध्याच्या कोरोना काळात व्हॅक्यूम क्लिनरसह देशातील नेत्यांना स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली एम्सचे सर्जरी विभाग प्रमुख डॉ. अनुराग श्रीवास्तव म्हणतात की, देशात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत अगदी छोटासा निष्काळजीपणा देखील संपूर्ण देशासाठी महागात पडू शकतो.

सार्वजनिक ठिकाणी झाडू वापरणे आणि कचरा उघड्यावर ठेवणे हे संसर्गास उत्तेजन देण्यासारखे आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी कोरोना विषाणू चार ते पाच दिवस जिवंत राहू शकतो.

झाडू मारताना हवेबरोबर धूळ देखील पसरू शकते, जी श्वासोच्छवासाद्वारे इतरांच्या शरीरात प्रवेश करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्किल इंडियाला चालना देण्याचा आग्रह धरतात असेही त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत देशात बनवलेल्या व्हॅक्यूम क्लीनरना प्रोत्साहन दिले पाहिजे. जेणेकरून ते स्वस्त आणि प्रत्येक माणसासाठी उपलब्ध होतील.

2 ऑक्टोबरला स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेणाऱ्या राजकारण्यांनी झाडूऐवजी व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करावा, असे आवाहन डॉ. श्रीवास्तव यांनी केले आहे. देशात सध्या पावसाळी हंगाम आहे, त्यामुळे हवेत ओलावा आहे. जर लोक मोकळ्या वातावरणात झाडू मारत असतील तर विषाणूचा फैलाव होण्याचा धोका अधिक असतो.