जमिनीवर झोपलेल्या बहिण-भावाचा सर्पदंशाने मृत्यू, राखी पोर्णिमेच्या पुर्वीच कुटूंबावर शोककळा

उत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – सातत्याने होत असणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर घरांमध्ये विषारी साप निघण्याच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशातच उत्तरप्रदेशमढील हरदोई जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. झोपेत असणाऱ्या दोघे बहीण भावांचा साप चावल्यामुळे मृत्यू झाला. साप चावल्यामुळे मुलगा ओरडल्यावर घरातील लोकांना सर्पदंशाबद्दल समजले मात्र या बहीण-भावांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना सण्डीला येथील लोहरई या गावात घडली. या गावात राहणारा अवधेश आपल्या परिवारासहीत झोपले होते. शेजारीच त्यांची ९ वर्षांची मुलगी सुमरन आणि ७ वर्षांचा मुलगा सुमित देखील झोपले होते. आधी सुमरनला साप चावल्यानंतर त्यानंतर ती उठली परंतु लगेच झोपली. त्यानंतर तिचा भाऊ सुमितला साप चावल्यानंतर मात्र तो जोराने ओरडला. मुलाची किंकाळी ऐकून वडील अवधेश यांनी उठून पहिले तर सापाने सुमितच्या हाताला वेढा घातलेला होता. त्यांनी सापाला सुमितपासून दूर करून मारून टाकले. त्यांच्या मुलीला देखील सापाने चावल्याचे लक्षात आले.

शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ दोघांना दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. ऐन रक्षाबंधनाच्या काळात या सख्ख्या बहीण-भावांवर काळाने घाला घातल्याने या कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त