चुलत भावा-बहिनीला करायचे होते लग्न ; घरच्यांच्या विरोधामुळे विष पिऊन संपवली जीवनयात्रा

तासगाव : पोलीसनामा ऑनलाइन – तासगाव तालुक्यातील बोरगाव येथे चुलत भावा-बहिणीच्या लग्नाला घरच्यांनी नकार दिल्यामुळे दोघांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गणेश बाळासो पाटील (वय ३४), सारिका संभाजी पाटील (वय २०, दोघेही रा. बोरगाव) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे.

गणेश व सारिका हे एकाच भावकीतील असून ते चुलत बहिण-भाऊ आहेत. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. या पूर्वी २२ ऑक्टोंबर रोजी हे दोघे पळून गेले होते. तशी फिर्याद मुलीच्या घरच्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दहा दिवसांच्या कालावधीनंतर सारिका व गणेश हे परत आले. त्यानंतर त्यांनी आमच्या दोघांचे प्रेम आहे, असे घरी सांगितले. पण घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले, की आपण एकाच भावकीतले आहोत व तुमचं नातं हे चुलत भावा-बहिणीचे आहे. एवढे सांगूनही ते घरच्यांचे म्हणने ऐकण्यास तयार न्हवते. घरचे लोक आपल्या प्रेमाला व लग्नाला होकार देणार नाहित हे जाणून त्यांनी बोरगाव राजापूर रोडवरील पाटील मळा येथे द्राक्ष बागेत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस हवालदार प्रशांत पठाणे, पोलीस हवालदार डामसे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व रात्री अडीचच्या सुमारास शवविच्छेदनासाठी तासगाव येथे आणण्यात आले. शवविच्छेदना नंतर ते मृतदेह २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनास्थळी मृतदेहाजवळ बागेवर औषध फवारणीची बाटली आढळली आहे. अधिक तपास तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डामसे व प्रशांत पठाणे हे करत आहेत.