कोंढव्यात गॅरेजचालकाचा खुन करणार्‍या सख्या भावांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – वडिलांकडे रागाने का पाहिले या कारणावरुन गॅरेजचालकावर पालघनने सपासप वार करुन निर्घुण खुन करणार्‍या दोघा सख्या भावांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. तौसिफ फरिद सैय्यद (वय २३) आणि सैफ फरीद सैय्यद (वय २५, रा. दिल्ली दरबार दुध डेअरीजवळ, मिठानगर, कोंढवा खुर्द) अशी त्यांची नाव आहे. त्यांनी बबलु इब्राही सैय्यद (वय ४६, रा. मिठानगर, कोंढवा) याचा खुन केला होता.

बबलु याचे कसब्यात गॅरेज आहे. तो पूर्वी कसबा पेठेत राहत होता. तौसिफ आणि सैफ हेही कसबा पेठेत राहत होते. दोन्ही आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बबलु आणि आरोपी यांच्यात यापूर्वीही वाद होते. कोंढवा येथील झोपडपट्टी पूनर्विकास योजनेमध्ये बबलुला फ्लॅट मिळाला. त्यामुळे तो कोंढव्यात रहायला आला.

१ जून रोजी बबलु घरातून बाहेर पडल्यावर त्याच्यासमोर तोसीफ सैय्यद यांचे वडिल फरीद हे आले होते. बबलुने त्यांच्याकडे रागारागाने पाहिले. त्यांनी ही बाब सैफ व तोसीफना सांगितली. त्यानंतर सैफ व तोसीफ या दोघांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने सायंकाळी साडेपाच वाजता कोंढव्यातील शाहीद कॉर्नर येथे बबलु याला गाठले. भररस्त्यावर त्याच्यावर पालघनने वार केले. तो जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्यानंतर ते पळून गेले. यावेळी शेकडो लोक तेथे असताना कोणीही बबलुच्या मदतीला पुढे आले नाही. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बबलु याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना रात्री त्याचा मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. कोंढवा तपास पथक आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, आरोपी हे आरटीओ परिसरात लपून बसले आहेत.

सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, पोलीस शिपाई आदर्श चव्हाण, हवालदार संतोष नाईक, सुशिल धिवार, अमित साळुंके, संजीव कळंबे, निलेश वणवे, ज्योतीबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे यांनी आरटीओ परिसरात शोध घेऊन दोघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी त्यांचा साथीदार अफताफ हसन शेख (रा. कसबा पेठ) आणि अराफत मकसुद सैय्यद (रा. पिंपरी) यांच्या मदतीने हा खुन केल्याची कबुली दिली.