Pune : एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा ‘कोरोना’ने घेतला बळी, गावावर शोककळा

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथील एका कुटुंबाला कोरोना घातक ठरला आहे. या गावातील दोन सख्ख्या भावांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

विठ्ठल भगवान नागवडे (वय-65) व त्यांचा लहान भाऊ सुभाष भगवान नागवडे (वय-59 रा. बाभूळसर बुद्रुक) अशी मृत्यू झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. नागवडे बंधूंना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विठ्ठल नागवडे यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा गुरुवारी (दि.13) केडगाव येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

विठ्ठल यांच्या निधनाचे वृत्त गावात समजले. त्यानंतर अवघ्या दोन तासात विठ्ठल यांचा लहान भाऊ सुभाष यांचा देखील मृत्यू झाल्याची बातमी आली. सुभाष यांच्यावर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अवघ्या दोन तासात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, आई, वडील, मुले, मुली, सूना असा परिवार आहे.