बांधकामाच्या वाळुच्या वादातून मध्यस्थी करणार्‍या तरुणाची निर्घुण हत्या

अमरावती : बांधकामासाठी लागणार्‍या वाळुवरुन सुरु असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाची तिघांनी निर्घुण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

वैभव भीमराव तायडे (वय २२, रा. चवरेनगर, अमरावती) असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक तुरट (वय २५), संकेत घुगे (वय २५), शुभम कुकडे (वय २६, रा. अमरावती) यांना अटक केली आहे. ही घटना गोपालनगरजवळील स्वागतम कॉलनीत गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि वैभव तायडे याची मानलेली बहीण यांच्यात बांधकामाच्या वाळुवरुन वाद होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी तायडे रात्री आरोपींकडे गेला होता. त्यावेळी झालेल्या भांडणात आरोपींनी सेंट्रींग राफटरणे वैभवच्या चेहर्‍यावर मारुन वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैभवला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टर तपासणीपूर्वी त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच राजा पेठ पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले.