गुजरात सीमेजवळ पाकिस्तानच्या 5 नौका जप्त, दहशतवादी घातपाताचा संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमा सुरक्षा दलाने गुजरात सीमेजवळ पाच पाकिस्तानी नौका जप्त केल्या आहेत. नुकतेच गुप्तचर विभागाने सागरी मार्गाने अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली होती. शुक्रवारी गुजरातमध्ये या नौका सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये भारत-पाक सीमेजवळ असणाऱ्या हरामी नाला परिसरातून पाच नौका जप्त करण्यात आल्या आहेत. हरामी नाला परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.

सागरी मार्गाने दहशतवादी भारतात घुसण्याचा धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्यानंतर सर्व सागरी सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली. मच्छिमारांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत काही संशयितांची धरपकडही करण्यात आली. गुजरातच्या नाला क्रीकजवळ अशा सोडून दिलेल्या नौका मिळण्याचं प्रमाण मात्र वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अशा सोडून दिलेल्या नौका मिळाल्या होत्या. त्या कुठून आल्या याविषयी स्थानिकांना समाधानकारक उत्तरं देता आली नव्हती. आता पुन्हा एकदा याच परिसरात पाकिस्तानी नौका सापडल्या आहेत.

जम्मू-काश्मीर सीमेवर भारतीय जवानांची कडक नजर आहेच. शिवाय देशाच्या इतर सीमांवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नेहमीच्या गस्तीच्या वेळी सीमा सुरक्षा दलाला या नौका दिसल्या. मच्छिमारीसाठी वापरतात तशा या नौका आहेत. अजूनपर्यंत या नौकांमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू सापडलेली नाही. पण या भागाची कसून तपासणी सुरू आहे.

Visit : Policenama.com