BSNL नं ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट, एकदम Free मिळणार 4G सीम कार्ड

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बीएसएनएलने म्हटले आहे की, त्यांचे 2G/ 3G ग्राहक 4G मध्ये विनामूल्य अपग्रेड करू शकतात, पण बीएसएनएलची ही ऑफर कायमची नसून केवळ ९० दिवसांसाठी आहे. या 4G सिमच्या ऑफरबद्दल जाणून घेऊया…

बीएसएनएलची ही ऑफर केवळ ९० दिवसांसाठी आहे आणि ही ऑफर १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. बीएसएनएलची ही ऑफर सर्व सर्कलसाठी उपलब्ध आहे. कोणत्याही स्टोअरमध्ये जाऊन आपले जुने 2G किंवा 3G सिम देऊ शकता आणि नवीन 4G सिम कार्ड घेऊ शकता.

सिमसह अशी अट आहे की, पहिल्या वेळी तुम्हाला १०० पेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, तरच 4G सिम मिळेल. बीएसएनएल 4जी नेटवर्क विस्तृत करण्यासाठी सॅमसंग, झेडटीई, नोकिया आणि एरिक्सन यासारख्या कंपन्यांची मदत घेत आहे. लवकरच ५०,००० टॉवर्सला 4G मध्ये अपग्रेड करण्याची कंपनीची योजना आहे.

विशेष म्हणजे अलीकडेच डीपीआयआयटीने बीएसएनएलला मोठा धक्का दिला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या विभागाने दूरसंचार विभाग आणि बीएसएनएलला 4जी नेटवर्कसाठी दिली जाणारी ९,००० कोटी रुपयांची निविदा रोखण्यास सांगितले आहे.

उद्योग व आंतरिक व्यापार संवर्धन विभागा (डीपीआयआयटी) च्या म्हणण्यानुसार, बीएसएनएलच्या निविदेवर परदेशी कंपन्यांना फायदा होत असल्याचा आरोप आहे. दूरसंचार उपकरण व सेवा निर्यात संवर्धन परिषदेने (टीईपीसी) तक्रार दिली आहे की, बीएसएनएलकडून मार्च महिन्यात जारी केलेल्या निविदेत नियमांचे उल्लंघन करून परदेशी कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.