BSNL च्या मोबाईल नेटवर्कमध्ये 53 % उपकरणं चीनी कंपन्यांचे, सरकारनं केलं मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मोबाईल नेटवर्कमधील जवळपास 53 टक्के उपकरणे जेटीई आणि हुवेई या दोन चिनी कंपन्यांकडून असल्याचे सरकारने कबूल केले आहे. या प्रकरणात, खासगी कंपन्यांची परिस्थिती अधिक चांगली आहे, कारण ते अशा प्रकारच्या उपकरणांची मागणी अनेक देशांकडून करतात.

संचार राज्यमंत्री यांनी माहिती दिली

BSNL च्या मोबाइल नेटवर्कमधील जवळपास 44 टक्के उपकरणे चिनी कंपनी ZTE आणि 9 टक्के उपकरणे हुवेईची आहेत. संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की सरकारकडे चिनी टेलिकॉम गिअर मेकर्स कंपन्यांच्या उपकरणांचा डेटा नाही.

धोत्रे यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) मोबाइल नेटवर्कपैकी 44.4 टक्के ZTE कडून व 9 टक्के इक्विपमेंट हुवेईची आहे. त्याचप्रमाणे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) च्या मोबाइल नेटवर्कमध्ये 10% हिस्सा चिनी कंपन्यांच्या इक्विपमेंटचा आहे.

खासगी कंपन्यांची ही परिस्थिती

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, आकडेवारीच्या आधारे त्यांनी सांगितले की रिलायन्स जिओ इन्फोकॉम आपल्या सेवांसाठी जेटीई आणि हुवेईची कोणतीही उपकरणे वापरत नाही. ते म्हणाले की टेलिकॉम कंपन्या त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार टेलिकॉम उपकरणे खरेदी करतात आणि अशा कंपन्यांना परवान्यात दिलेल्या सुरक्षा तरतुदींचे पालन करावे लागते.

इतर खासगी कंपन्यांविषयी माहिती देताना ते म्हणाले की व्होडाफोन आयडिया लिमिटेड आपल्या नेटवर्कमधील अनेक विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या उपकरणांचा वापर करते आणि नेहमीच सुरक्षा-संबंधित मानकांचे पालन करते. त्याचप्रमाणे भारती एअरटेल भारत, अमेरिका, युरोप, चीनसारख्या अनेक देशांच्या कंपन्यांची उपकरणे वापरत आहे.

डेटा सुरक्षा समस्या

विशेष म्हणजे सध्या देशात चीनविरोधी वातावरण आहे, चिनी गुंतवणूक आणि चिनी कंपन्यांच्या उत्पादनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. चिनी कंपन्यांच्या उपकरणांद्वारे भारतात हेरगिरी व डेटा चोरीचे अनेक आरोपही झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकार खूप सजग झाले आहे. बीएसएनएलचे नेटवर्क बर्‍याच सरकारी विभागात वापरले जाते, म्हणून ही अत्यंत संवेदनशील बाब आहे.