चीनला आणखी एक धक्का, BSNL – MTNL कडून 4G टेंडर रद्द !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. BSNL आणि MTNL ने आपले 4G टेंडर रद्द केले आहे. आता पुन्हा नवीन टेंडर जारी केले जाणार आहे. सरकारने BSNL आणि MTNL ला चिनी कंपन्यांकडून वस्तू न खरेदी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर यासंबंधीच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यानंतर बीएसएनएल आणि एमटीएनएलने टेंडर रद्द करून चिनला आणखी एक दणका दिला आहे.

आता नव्या निवेदनात मेक इन इंडिया आणि भारतीय टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदी असणार आहेत. विशेष म्हणजे BSNL आणि MTNLवर सर्वाधिक चिनी उत्पादने खरेदी केल्याचा आरोप होता. यानंतर सरकारने निर्देश दिला होता की, सरकारी कंपन्यांनी चिनी कंपन्यांकडून वस्तू खरेदी करणे टाळावे.

दूरसंचार मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात असे म्हटले होते की, 4G सुविधेच्या अपग्रेडेशनमध्ये कोणत्याही चिनी कंपन्यांनी बनविलेल्या उपकरणांचा वापर करू नये. संपूर्ण निविदा नव्याने देण्यात याव्यात. तसेच सर्व खासगी सर्व्हिस ऑपरेटर्शना सुद्धा चिनी उपकरणे कमी करण्याच्या सूचना देण्यात येतील.

मोनोरेलसंबंधी 2 निविदा रद्द
BSNL आणि MTNL ने यापूर्वी 4G नेटवर्कसाठी चिनी कलपुर्जे न वापरण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय चिनला हादरा देण्यासाठी रेल्वेने 471 कोटींचा सिग्नलिंग प्रकल्प रद्द केला होता. याव्यतिरिक्त एमएमआरडीएने मोनोरेलशी संबंधित 2 चिनी कंपन्यांची निविदा रद्द केली आहे. एमएमआरडीएने 10 मोनोरेल रॅक बनविण्याची बोलीही रद्द केली. मेरठ रॅपिड रेल्वेची निविदा चिनी कंपनीकडे होती, ती देखील रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने तळेगाव येथील ग्रेट वॉलचे टेंडर रद्द केले. हरयाणा सरकारने चिनी कंपन्यांचे 780 कोटी रुपयांचे ऑर्डर रद्द केले आहे.