BSP Chief Mayawati News : वाढदिवशी मायावतींची मोठी घोषणा, म्हणाल्या – ‘उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्वबळावर लढणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत बसपा (BSP) कोणासोबतही आघाडी न करता स्वबळावर लढणार असल्याची मोठी आणि महत्वाची घोषणा बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रिमो मायावती यांनी शुक्रवारी (दि. 15) आपल्या वाढदिनी केली आहे. निवडणुकीत आघाडी केल्याने पक्षाचे नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत बीएसपीचा विजय निश्चित असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. मायावती आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

तसेच देशात उद्यापासून सुरू होणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचंही मायावतींनी स्वागत केले आहे. सर्व नागरिकांसाठी कोरोना लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली. आपल सरकार सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशच्या प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस पुरवण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. देशात कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मायावती यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.

मायावती आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब, असहाय्य आणि कोरोना रुग्णांना मदत करण्याचा आग्रह मायावतींनी आपल्या कार्यकर्त्यांकडे केला आहे.