कर्नाटक : बहुमत चाचणीला गैरहजर राहणाऱ्या ‘बसप’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी

लखनऊ : वृत्तसंस्था – बसप अध्यक्ष मायावती यांनी कर्नाटकातील एकमेव बसप आमदार एन. महेश यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मंगळवारी कर्नाटक विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीत अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बसपा अध्यक्षा मायावती यांनी त्यांना कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश दिला होता. पक्षाच्या आदेशाचा भंग केल्यामुळे त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागले.

याआधी कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याच्या दरम्यान मायावती यांनी ट्विट करून म्हटले होते की, बसप अध्यक्ष मायावती यांनी बसप आमदार यांना कुमारस्वामी सरकारच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आदेश दिले आहेत.

मायावती यांनी सुरवातीपासून कर्नाटकमधील घडामोडींवर लक्ष ठेवले होते. त्यांनी कर्नाटक आणि गोव्यात अचानक आमदारांनी केलेल्या पक्षांतरावर चिंता व्यक्त करत पक्षांतराच्या विरोधात एक कडक कायदा आणण्याची मागणी केली होती. मायावती यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, कर्नाटक आणि गोव्यामध्ये भाजप धनशक्तीच्या जोरावर आमदारांची खरेदी करत आहे. हे काम लोकशाहीला काळीमा आहे. आता पक्षांतर करणाऱ्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची वेळ आली आहे असे मायावती म्हणाल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त