‘बुवा-बबुआ’ मध्ये काल ‘घटस्फोट’ : आज ‘या’ अटीवर एकत्र येण्याचे दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काल दिल्लीत पार पडलेल्या चिंतन बैठकीत मायावती यांनी उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. मात्र आज त्यांनी पुन्हा याबाबतीत मोठी घोषणा केली आहे. आज दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी म्हटले कि, जर त्यांच्या राजकीय जीवनात सपा प्रमुख यशस्वी झाले तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ. मायावती पुढे म्हणाल्या कि”सपा -बसपाची महाआघाडी झाल्यापासून अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांनी मला खूप आदर दिला. देशाच्या हितासाठी आम्ही आपले सर्व मतभेद विसरून एकत्र आलो आणि त्यांचा आदर केला. आमचे संबंध केवळ राजकारणासाठी नाही, तर ते कायमचे राहतील. त्याबरोबरच त्या म्हणाल्या कि, राजकारणात भावनेला महत्व नाही तर परिस्थिती पाहून विचार करावा लागतो. यादवांचे मतदान बसपाला मिळाले नाही, असे सांगत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.

यावेळी सपावर टीका करताना त्यांनी म्हटले कि, त्यांना त्यांच्या खूप नेत्यांत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांचे प्रमुख उमेदवारच पराभूत झाल्याने त्यांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आमच्यासोबत त्यांचं हे नातं दीर्घकाळासाठी आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. लोकसभा निवडणुकीत सपाला त्यांची हक्काची मतंही मिळाली नाहीत तर बसपाला कशी मिळाली असती ? यादव पक्षानं समाजवादी पक्षाची साथ सोडली.

दरम्यान, अखिलेश यादव यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याविषयी त्यांना विचारले असता मायावती म्हणाल्या “सपा आणि बसपा कायमचे वेगळे झालेले नाहीत त्यामुळे भविष्यात आम्हाला असे वाटते की अखिलेश यादव त्यांच्या राजकीय कार्यामध्ये यशस्वी झाले तर आम्ही पुन्हा एकत्र काम करू. परंतु जर ते यशस्वी झाले नाही तर आमच्यासाठी स्वतंत्रपणे काम करणे चांगले राहील. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे पोटनिवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मायावती यांच्या या निर्णयामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला याचा किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.