‘बुवा-बबुआ’ मध्ये ‘घटस्फोट’ ; पोटनिवडणूका स्वबळावर लढण्याची मायावतींची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज दिल्लीत पार पडलेल्या चिंतन बैठकीत मायावती यांनी महाआघाडीचा उत्तर प्रदेशात काही फायदा झाला नाही.

यादवांचे मतदान बसपाला मिळाले नाही, असे सांगत उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यामुळे आता या दोघांची युती तुटण्याची शक्यता जवळपास नक्की झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती आणि अखिलेश यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी महायुती केली होती. त्याचबरोबर आरएलडी देखील त्यांच्यासोबत युतीमध्ये होती. त्यावेळी बसपाने ३८, सपा ३७ आणि आरएलडीने ३ जागा लढविल्या होत्या. अमेठी आणि रायबरेलीची जागा त्यांनी काँग्रेससाठी सोडली होती. मात्र दोघे एकत्र येऊन देखील भाजपला उत्तर प्रदेशात हरवू शकले नाही. ८० जागांपैकी बसपला केवळ १० जागा मिळाल्या. तर समाजवादीला ५ जागांवर समाधान मानावे लागले. तर एनडीएने ६४ जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान, या निवडणूक निकालामुळे नाराज झालेल्या मायावतींनी येत्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.