…तर ‘त्यांच्या’ आई-बहिणीला आम्ही उचलून आणू ; बसपा आमदाराची जीभ घसरली 

जयपूर : वृत्तसंस्था – जर पोलिसांनी अपहृत तरुणीचा छडा लावला नाही, तर आरोपींच्या आई-बहिणीला उचलून आणू, असे वक्तव्य उदयपुरवाटीचे बसपाचे आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी राजस्थानच्या सीकर इथून एका नवविवाहितेचे अपहरण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

सीकर येथून १६ एप्रिल रोजी एका नवविवाहितेचे अपहरण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली होती. त्यावेळी बसपाचे आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी लवकरात लवकर अपहृत तरुणीचा छडा लावावा या मागणीसाठी गेले काही दिवस सीकरच्या जिल्हाधिकाऱ्याच्या घराबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत.  त्यावेळी, पोलिसांनी आमच्या बहिणीला शोधले नाही आणि आरोपींनाही अटक झाली नाही. प्रशासनाला दिलेली मुदत संपली आहे, आणि तरीही हे असेच सुरू राहिले तर आरोपींच्या आई-बहिणीला आम्ही उचलून आणू, असे आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी म्हटले.

इतकेच नव्हे तर, आरोपींच्या अटकेची मागणी करत आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी स्वतः ला पेटवून द्यायचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सर्वत्र टीकास्त्र सोडण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जातो असे आवाहन सीकरचे पोलीस अधीक्षक अमनदीप सिंह कपूर यांनी केले. याचबरोबर, अपहरण प्रकरणाचा छडा पोलिसांनी जवळपास लावला आहे. तर पाच पोलीस पथके आरोपींच्या अटकेसाठी पाठवण्यात आली आहेत, असेही त्यांनी म्हटले.