BSP च्या महिला आमदारानं केलं CAA चं ‘समर्थन’, पक्षातून झालं तडकाफडकी ‘निलंबन’

भोपाळ : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करणाऱ्या आमदार रमाबाई परिहार यांची बहुजन समाज पार्टीतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. परिहार या मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील पथरिया येथून बसपच्या तिकीटवर आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. केंद्र सरकारने नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले आहे.

केंद्र सरकारने मंजूर करून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देशातून विरोध होत असताना बसपा आमदार परिहार यांनी त्याचे समर्थन केले होते. त्यामुळे त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. रविवारी (दि.29) सकाळी मायावती यांनी ट्विट करून रमाबाई परिहार यांना पक्षातून काढण्यात आल्याची माहिती दिली. बसपा हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. शिस्त न पाळणाऱ्या आमदार, खासदारांवर तात्काळ कारवाई करण्यात येते. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देणाऱ्या परिहार यांना पक्षातून निलंबित करण्यात येत आहे. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे, असे ट्विट मायावती यांनी केले आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विभाजनकारी आणि असंवेधानिक असल्याचा ठपका ठेवत बसपने याला विरोध केला होता. संसदेमध्येही बसपने या विधेयकाविरुद्ध मतदान केले होते. तरी देखील आमदार रमाबाई परिहार यांनी त्याचे समर्थन केले. याआधीही त्यांना पक्षातील शिस्त पाळण्याबाबत ताकीद देण्यात आली होती, असेही मयावती यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/