कोलकत्याहून लग्नासाठी आलेल्या मैत्रिणीला न भेटताच मित्र पळाला गावाकडे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – टिकटॉक, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सारख्या सोशल मडियावरून ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी एक अल्पवयीन तरुणी थेट कोलकात्याहून औरंगाबादला आली. मात्र तिला टाळण्यासाठी मित्र गावी निघून गेला. ही बाब समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांना बोलावून तीला त्यांच्या स्वाधिन केले.

कोलकात्ता येथे राहणारी आणि इयत्ता दहावीत शिकणारी 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे औरंगाबादमधील एका तरुणासोबत टिकटॉक च्या माध्यमातून ओळख झाली. टिकटॉक बंद झाल्यामुळे दोघे फेसबूक आणि इंस्टाग्राम या समाजमाध्यमातून मित्र बनले. यादरम्यान त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक परस्परांना दिल्याने ते व्हॉटसॲपवर चॅटिंग करू लागले, त्यानंतर व्हिडिओ कॉल करून संवाद साधूू लागले. अशातच 20 नोव्हेंबर रोजी आई रागावल्याने ती घरातून 17 हजार रुपये घेऊन घराबाहेर पडली. तेथून थेट हावडा रेल्वे जंक्शन येथून रेल्वेने ती नागपूरला आली. नागपूर येथून अकोला येथे आणि अकोल्याहून 24 तारखेला ती औरंगाबादमध्ये पोहचली. प्रवासादरम्यान ती तिच्या मित्रासोबत फोनवर बोलत होती. मात्र ती खरेच औरंगाबादला येईल असे त्याला वाटत नव्हते. तिने बोलतांना त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी आणि कायम येथे राहण्यासाठी आल्याचे सांगितले. यामुळे तो घाबरून गेला. तिला न भेटता तो गावी निघून गेला होता.

तरुणीने गॅरेजचालकाच्या घरीच केला मुक्काम
संबधित तरुण हा मुकुंदवाडी परिसरातील मोटार गॅरेजवर कामाला होता. त्याने तिला त्याच गॅरेजचा पत्ता दिल्याने ती मंगळवारी सायंकाळी थेट गॅरेजवर पोहचली. तर इकडे तरुणाने गॅरेजमालकांना फोन करून ती येणार आहे. मात्र तिच्यामुळे नाहक पोलिसांचे लचांड मागे लागेल या भीतीपोटी आपण गावी जात असल्याचे सांगितले. यानंतर गॅरेजचालकाने ही बाब पुंडलिकनगर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याशी संपर्क साधून तरुणीविषयी माहिती दिली.

अन् पोलिसांनी तिच्या डोक्यातील प्रेमाचे भूत उतरवले
संबधीत तरुणीला विश्वासात घेऊन पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक घेतला. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधला. त्यानंतर बंगळूरू येथे राहणारी तिची आत्या आणि आत्याचे पती विमानाने बुधवारी सकाळी औरंगाबादला पोहचले. पोलिसांनी तिला त्यांच्या ताब्यात दिले आणि सोशल मिडियावरील आभासी प्रेमाचे डोक्यावरील भूत उतरविले.

You might also like