‘लष्कर ए तोयबा’च्या अतिरेक्यासह 4 जणांना अटक, ‘बडगाम’ मोड्युल उद्धवस्त

श्रीनगर : बडगाम पोलीस आणि लष्कराच्या ५३ आर आर बटालियनने लष्कर ए तोयबाचा टॉप अतिरेकी वसीम गानी याला व त्याच्या ३ साथीदारांना अटक केली आहे. बेरवाह येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा गट परिसरातील दहशतवाद्यांना आश्रय देत तसेच तांत्रिक मदत पुरविण्यात सहभागी होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी लष्कराच्या मदतीने या अतिरेकी गटाच्या ठिकाणांवर शनिवारी रात्री छापा टाकून चार जणांना अटक केली आहे.

बडगाम पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन बडगाम पोलीस आणि लष्कराच्या ५३ आर आर बटालियन व सीआरपीएफसह जहूर वानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अतिरेक्याला काही दिवसांपासून ताब्यात घेतले होते. त्याने त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणी घातक साहित्य आणि शस्त्रे, दारुगोळा असा मोठा साठा लपवून ठेवला होता. तेथे आणखी चार जण सापडले होते. पटकी युनिस मीर, असलम शेख, परवेझ शेख आणि रहमान लोणे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक महत्वाची माहिती उघडकीस आली. त्यातून अतिरेक्यांचे बडगाम मोड्युल समोर आले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई करुन आणखी चार जणांना अटक केली.