Budget 2020 : केंद्रीय अर्थसंकल्पाचं ‘मनसे’कडून स्वागत, मोदी सरकारचे मानले आभार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केंद्रीय अर्थसकल्पाचं स्वागत केलं आहे. बँक खात्यातील ठेवींवर विमा संरक्षण 1 लाखांहून 5 लाखांपर्यंत वाढवून तसेच आयकरात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य आहे नांदगावकर म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बाळा नांदगावकर म्हणाले, “आम्ही काल अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी ठेवींवरील विमा संरक्षण 1 लाखापासून वाढवून 5 लाख करावे आणि आयकर कमी करून जसा मोठ्या उद्योगधद्यांना दिला तसाच मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा अशी जाहीर मागणी केली होती. याची दखल घेत दोन्ही मागण्या प्राधान्यानं जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो. यामुळे बँकेतील ठेवीदारांना आणि मध्यमवर्गीय करदात्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या प्रकारच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत त्यावरून असं दिसत आहे की, मनसे आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत आहे. अशात अलीकडेच मनसेनं हिंदुत्वाचा नारा दिलाा आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या प्रचारादरम्यान भाजपवर सडकून टीका करणारी मनसे आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या धोरणांवर सौम्य झाल्याचं दिसत आहे.