Budget 2020 : ‘नव्या बाटलीत जुनी दारू’ इतकंच, – बाळासाहेब थोरात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात मुंबई आणि महाराष्ट्राची निराशा झाल्याचं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई आणि महाराष्ट्र सगळ्यात जास्त कर देशाला देतो परंतु मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात ठोस काही नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

अर्थसकंल्पावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “या बजेटमध्ये नवीन असं काहीच नाही. नव्या बाटलीत जुनीच दारू इतकंच आहे. आधी सांगितलेलं शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार परंतु त्यासाठी ठोस उपाययोजना नाहीत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असले तर कृषी विकास दर 11 टक्के असला पाहिजे परंतु तो फक्त 2 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे ही पोकळ घोषणा असून शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

5 नवीन स्मार्ट सिटीची घोषणा केली परंतु जुन्या 100 स्मार्ट सिटींचं काय झालं. सर्वसामान्य नागरिकांना काय सुविधा दिल्या, ते नाही सांगितलं. अर्थव्यवस्था मोडकळीला आली आहे. अर्थसंकल्प सादर होत असतानाच शेअर बाजार कोसळला आहे हे कसलं निर्देशक आहे. रेल्वे खासगीकरण करणार, LIC, ODBI विकत काढणार त्यामुळे केंद्राचं बजेट कुचकामी आहे” असंही ते म्हणाले.

आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र कुठे आहे ? सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबई आणि महाराष्ट्राची घोर निराशा मोदी सरकारनं केली आहे. मोदी सरकारला महाराष्ट्राचे वावडे आहे का ? असंही त्यांनी विचारलं.