Budget 2020 : शेतकर्‍यांना दरवर्षी मिळणार्‍या 6000 रूपयांच्या स्कीममध्ये बजेटमध्ये होऊ शकते ‘कपात’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचं वितरण 20 टक्क्यांनी घटवून जवळपास 60000 कोटी करण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे काही राज्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अडथळे येत आहेत. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने 2019-20 च्या बजेटमध्ये या योजनेसाठी बजेटच्या अनुमानात 75000 कोटींचं वितरण केलं होतं. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत मिळून एकूण 6000 रुपये दिले जातात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात सुधारीत अंदाज 61000 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. याचं कारण म्हणजे पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांकडून ही योजना लागू न करणं आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांची योग्य आकडेवारी उपलब्ध नाही. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचं उद्दिष्ट 14.5 कोटींहून घटवत 14 कोटी करण्यात आलं आहे.

2019 च्या बजेटमध्ये झाली होती सुरूवात
एका सूत्रानं सांगितलं आहे की, सरकार 2020-21 साठी जवळपास 61000 कोटींचं वाटप करू शकतं. हे जवळपास 2019-20 च्या सुधारीत अंदाजाएवढंच आहे. सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेची सुरुवात केली होती. यात 2 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या लहान आणि किरकोळ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

कृषी कर्ज वाटपात वाढ होण्याची शक्यता
सरकार अ‍ॅग्रीकल्चर लोन वाटपाच्या उद्देशात 10 टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात 13.5 लाख कोटी रुपये वाटपाचं उद्दिष्ट आहे. चालू आर्थिक वर्षात कृषी कर्ज वाटप उद्दिष्टानुसार झालं आहे.