Budget 2021 : गाडी खरेदी करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी, खिशावरचा 30 टक्के भार हलका होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन क्षेत्रासाठी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली आहे. यामुळे आता खासगी वाहन 20 वर्षांनी, तर व्यवसायिक वाहन 15 वर्षांनी स्क्रॅप केली जाणार आहेत. या धोरणामुळे मरगळलेल्या वाहन क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या गाड्यांची मागणी वाढल्याने वाहन निर्मिती क्षेत्राला गती मिळणार आहे. यामुळे वाहनांच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत खाली येतील. जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण 25 टक्क्यांनी कमी होईल. वाहन निर्मिती क्षेत्रासाठी ही घोषणा सकारात्मक ठरणार आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प संसदेत सोमवारी (दि. 1) सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी वाहन क्षेत्रासाठी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग धोरणाची घोषणा करताच महिंद्रा एँड महिंद्रा, मारुती, बजाज ऑटो, अशोक लेलँडच्या समभागांनी उसळी घेतली. या कंपन्यांच्या समभागाचे मूल्य 2 टक्क्यांनी वधारले आहे. काही आठवड्यांपूर्वीच सरकारने नव्या स्क्रॅपिंग धोरणाला मंजुरी दिली. एप्रिल 2022 पासून या धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर वाहन क्षेत्राला नवचैतन्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.