Budget 2021 : टॅक्सपेयर्सला झटका देऊ शकतात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची आशा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  केंद्रीय बजेट सामान्य लोकांसाठी खुप आशा घेवून येते. टॅक्सपेयर्सला दरवर्षी इन्कम टॅक्स दरात दिलासा मिळण्याची आशा असते. तर, देशातील गरीब आणि वंचित माणूस सरकारकडून आपल्यासाठी मोठ्या घोषणांची आस लावून बसलेला असतो. असे म्हटले जात आहे की, बजेट 2021 मध्ये मोदी सरकार मध्यमवर्गीय कुटुंबियांना झटका देऊ शकते, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी सुद्धा टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करणार नाहीत. सीएनबीसी-टीव्ही18 नुसार, आर्थिक वर्ष 2021-22 साठी केंद्रीय बजेटमध्ये व्यक्तिगत प्राप्तीकर स्लॅबमध्ये दुरूस्तीची शक्यता नाही.

अर्थमंत्रालय दुसर्‍या उपायांद्वारे टॅक्सपेयर्सला इन्कम टॅक्समध्ये दिलासा देण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत अर्थमंत्रालय प्राप्तीकर कायदा कलम -80सी अतंर्गत सवलतीची मर्यादा वाढवण्याच्या विनंतीवर विचार करत आहे. सध्या सेक्शन-80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची टॅक्स सूट मिळते. मोदी सरकार 1 फेब्रुवारी 2021 ला सादर करणार असलेल्या बजेटमध्ये सेक्शन-80सी अतंर्गत मिळणारी सूट 1.5 लाखांवरून वाढवून 2 लाख रुपये करू शकते.

गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वाढवली जाऊ शकते कपात मर्यादा

केंद्र सरकार गुंतवणुकीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी कलम-80 सी अंतर्गत सवलतीची मर्यादा वाढवण्याची योजना बनवत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, यामुळे गुंतवणूक वाढेल आणि देशाच्या विकासाला चालना मिळेल. बजेट 2021 मध्ये होम लोनचे व्याज आणि मुख्य रक्कम दोन्हीच्या देय रक्कमेवर कपातीची मर्यादा वाढवली जाऊ शकते. सध्याच्या टॅक्स स्लॅबनुसार, 2.5 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान उत्पन्न असणार्‍यांवर 5 टक्के, 5 ते 10 लाख रुपयांसाठी 20 टक्के आणि 10 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणार्‍यांवर 30 टक्के टॅक्स लावला जातो. नवी टॅक्स व्यवस्था निवडणार्‍यांसाठी दर वेगळे आहेत. अर्थमंत्री सीतारामन 1 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करतील.