Budget 2021 : Income Tax ‘स्लॅब’ जैसे थे’, करदात्यांना दिलासा नाहीच

पोलीसनामा ऑनलाईन – अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल केला जातो का ? याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागले होते. पण सरकारने त्यात कोणताही बदल न करता नोकरदार वर्गाची निराशा केली आहे. त्यामुळे करदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षातही आयकर भरावा लागणार आहे. तर 75 वर्षांवरील नागरिकांना ‘इन्कम टॅक्स’मधून आता सूट दिली आहे. केवळ 75 वर्षे झालेल्या पेन्शनधारकांसाठीच ही सूट असणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. 2020-21 या वर्षात देशात एकूण 6.4 कोटी नागरिकांनी आयकर भरल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. टॅक्स ऑडिटची मर्यादा 5 कोटींवरुन वाढवून 10 कोटी इतकी केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. इन्कम टॅक्स स्लॅब’मध्ये कोणताही बदल न केल्याने गेल्यावर्षी सारखीच कर रचना राहणार आहे. यात 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे त्यांना आयकर भरण्याची गरज नाही. तर 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर भरावा लागणार आहे. 5 ते 7.5 लाखांपर्यंत 10 टक्के, 7.5 ते 10 लाखापर्यंत 15 टक्के,10 ते 12.5 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के, 12.5 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 25 टक्के आणि15 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के आयकर भरावा लागणार आहे.