२५ फेब्रुवारीला सुरु होणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रचे २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आज विधानसभा व विधानपरिषदेची कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीत अधिवेशनाची तारिख निश्चित करून जाहीर करण्यात आली आहे.

विधिमंडळाचे अधिवेशन हे २५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. तर राज्याचे आर्थिक अंदाजपत्र हे २७ फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे. तर शनिवारी २ मार्च रोजी दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिवसभराचा वेळ राखीव ठेवला जाणार आहे. या अधिवेशन काळामध्ये विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयके, तर विधानपरिषदेचे एक प्रलंबित विधेयक मांडण्यात येणार आहे.

विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

राज्याच्या राजकारणाचा मूड सध्या लोकसभा निवडणुकीचा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील थोडक्या दिवसात आवरण्याचा घाट घातला जात आहे. अवघ्या सहा दिवसात हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या दरम्यान सरकारला शेतकऱ्यांच्या आणि दुष्कळाच्या मुद्द्यावर विरोधांकडून घेरले जाण्याचा संभव आहे.