संविधानात बजेट ‘या’ शब्दचा उल्लेख देखील नाही, जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबतच्या ‘या’ 5 रोचक गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी 2020-21 या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करतील. हे त्यांचे आणि मोदी 2.0 चे दुसरे बजेट असेल. देशातील सामान्य लोक, उद्योजक आणि विश्लेषकांना या अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा आहेत. सीतारमण हे बजेट अशा वेळी सादर करणार आहे जेव्हा चालू आर्थिक वर्षाच्या जीडीपी वाढीच्या टक्केवारीच्या अंदाजाची घोषणा अपेक्षित आहे. दरम्यान, अश्या पाच गोष्टी आहेत ज्यामुळे आगामी काळात बजेटशी संबंधित गोष्टी समजून घेण्यास त्या आपल्याला मदत करतील.

1) ‘बजेट’ शब्द :
सर्वांनी बजेट या शब्दाचा अर्थ माहित असला तरी भारतीय राज्यघटनेत ‘बजेट’चा उल्लेखही नाही. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 112 मध्ये ‘वार्षिक वित्तीय विधान’ (annual financial statement) असा उल्लेख आहे. बजेट या शब्दाचा उगम लॅटिन भाषेच्या बल्गा (bulga)  या शब्दामध्ये झाला आहे. बल्गा म्हणजे चामड्याची पिशवी.

2) देशाचे पहिले बजेट :
स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले केंद्रीय बजेट आर.के. शण्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केले. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक म्हणून घोषित झाल्यानंतर जॉन मथाई यांनी 29 फेब्रुवारी 1950 रोजी भारतीय प्रजासत्ताकाचे बजेट सादर केले.

3) द ड्रीम बजेट :
एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री होते. त्यांनी 1997-98 च्या अर्थसंकल्पात वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट करात कपात केली होती. या व्यतिरिक्त बर्‍याच आर्थिक सुधारणा केल्या. म्हणूनच हे बजेट अजूनही ‘ड्रीम बजेट’ म्हणून ओळखले जाते.

4) सर्वात जास्त वेळा बजेट :
देशाचे माजी पंतप्रधान व अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी दहा वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या प्रकरणात काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम दुसर्‍या आणि प्रणव मुखर्जी तिसर्‍या क्रमांकावर आहेत. चिदंबरम यांनी नऊ वेळा तर मुखर्जी यांनी आठ वेळा संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

5) ब्लॅक बजेट :
तत्कालीन अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1973-74 मध्ये सादर केलेल्या बजेटला ब्लॅक बजेट म्हटले जाते. मोठ्या प्रमाणात नुकसानीमुळे त्यांच्या बजेटला ब्लॅक बजेट म्हणतात.

फेसबुक पेज लाईक करा –