कोल्हापूरात कुत्रा चावल्यानं म्हशीचा मृत्यू, दूध घेणाऱ्या 200 गावकऱ्यांची रुग्णालयात धाव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका गावातून एक अजब प्रकार समोर आला आहे. एका म्हशीला कुत्रा चावल्यानं रेबीज होऊन तिचा मृत्यू झाला. परंत यानंतर गावातील 200 जणांनी भीती पोटी दवाखाना गाठला. कारण त्यांनाही भीती वाटत होती की, आपल्यालाही रेबीज होतो की काय. या घटनेनं घाबरलेल्या तब्बल 200 जणांनी रेबीजची लस घेतली. कोल्हापूरातील शिये गावातील हा प्रकार आहे. म्हशीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं दूध पिणाऱ्यांना रेबीजची भीती वाटू लागली.

आरोग्य अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांना सल्ला

शासकीय विभागाला या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर आरोग्य अधिकारी गावात दाखल झाले. त्यांनी असं सांगितलं की, ज्या नागरिकांनी दूध उकळून घेतलं होतं त्यांना काळजी करण्याचं कारण नाही. ज्यांनी म्हशीचं दूध न उकळता घेतलं आहे त्यांनी रेबीजचा प्रतिबंध करणारी लस घेणं गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला.

नेमकी घटना काय ?

कोल्हापूरापासून 6 किमी अंतरावर असणाऱ्या हनुमान नगर भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या म्हशीला एक पिसाळलेला कुत्रा चावला यानंतर त्या म्हशीचा मृत्यू झाला. म्हशीचा मृत्यू रेबीजनं झाल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं. गावातील शेकडो गावकरी असे होते जे या म्हशीच्या दुधाचे सेवन करत होते. परंतु म्हशीच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच गावातील लोकांना रेबीज होण्याची भीती वाटू लागली. यानंतर घाबरेलल्या गावकऱ्यांनी रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी थेट दवाखाना गाठला. सध्या शिये गवातील या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा