‘काश्मीरमध्येही फिल्म सिटी उभारा’, शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी उभारणार असल्याचं म्हटलं आहे. यानंतर देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. योगींच्या वक्तव्यांतर आज (शुक्रवार दि 25 सप्टेंबर) सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. काश्मीरमध्येही फिल्म सिटी उभारा असा खोचक टोला सामनातून भाजपला लगावण्यात आला आहे.

काय लिहलंय सामनाच्या अग्रलेखात ?

खरं तर कलम 370 हटवल्यानंतर केंद्रानं काश्मीरमध्ये अशा एखाद्या फिल्म सिटीची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगतात चित्रीकरण करण्यासाठी काश्मीर, शिमला, मनाली, शिलाँग अशा भागात जात होते. तिथेही भव्य फिल्म सिटी उभारता येईल.

मुंबई म्हणजे चित्रपटसृष्टीची जन्मभूमी किंवा कर्मभूमी हे ठसवण्यात गेल्या 100 वर्षात अनेकांचे योगदान आहे. कोल्हापुरात मराठी सिनेमे तर मुंबईत हिंदी सिनेमे वर्षानुवर्षे तयार होत आहेत. मुंबईला जी चमक धमक मिळत असते त्यात मायानगरीचे अस्तित्व हे कारण आहेच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचं खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दबाव टाकण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत.

जणू काही सिनेउद्योगानं व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावं असं वातावरण निर्माण केलं जात आहे का अशी शंका येऊ लागली आहे असंही यात नमूद करण्यात आलं आहे.