मनी लाँड्रिग प्रकरण : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय बिल्डर योगेश देशमुख यांना ED कडून अटक

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  अटक केली आहे. देशमुख यांना ईडीची अटक हा आमदार प्रताप सरनाईक यांना धक्का असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी ईडीने सरनाईक यांचा सर्वात जवळचा मित्र अमित चंदेल यांनाही अटक केली होती.

योगेश देशमुख यांना अटक केल्याचे वृत्त प्रताप सरनाईक यांच्यावर वेळोवेळी आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी Tweet करत ही माहिती दिली आहे. ईडीने १७ मार्च रोजी योगेश देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पूर्वी ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरावर, तसेच कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यावेळी ईडीने विहंग यांची तब्बल ५ तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घरावर, कार्यालयात आणि हॉटेल अशा एकूण १० ठिकाणी छापे टाकले होते.