पुणे : कोंढव्यातील बहुमजली इमारतीच्या 5 व्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यातील बहुमजली इमारतीत एका पाचव्या मजल्यावरील घरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोंढवा बुद्रुक परिसरात वेलकम हॉल मागे कुमार सुरक्षा ही बहुमजली सोसायटी आहे. याठिकाणी तिवारी म्हणून कुटूंबीय पाचव्या मजल्यावर राहतात. दरम्यान, गॅसचा स्फोट होऊन अचानक भीषण आग लागली. स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. येथील रहिवाशांनी अग्निशामक दल व पोलीसांना याची माहिती दिली. यावेळी कोंढवा फायर ब्रिगेडच्या दोन बंद आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले.

सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले होते. या फ्लॅटसोबतच्या शेजारच्या फ्लॅटलाही या आगीची झळ पोहचली. यात घरातील साहित्य पुर्णपणे जळून खाक झाले आहे. तिवारी यांच्या फ्लॅटमध्ये कोणीही नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली असून, कुलींग करण्याचे काम सुरू आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसराच प्रचंड गोंधळ उडाला होता. बघ्यांनी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/