राममंदिर बांधणे हा न्यायालयाचा विषय नाही : खा. संजय राऊत 

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राममंदिर बांधणे हा विषय न्यायालयाचा नाही. बोफोर्सबाबत जसा जनतेने निर्णय घेतला होता, तसाच राफेलबाबतही जनताच निर्णय घेईल, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याच्या तयारीनिमित्ताने ते श्रीक्षेत्र पंढरपूरला आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

राऊत म्हणाले, महाराष्ट्रात रामराज्य व शिवशाही आणण्यासाठीच पांडुरंगाच्या दरबारात शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते, संत-महंत, धर्माचार्य उपस्थित राहणार आहेत. शिवसेना हिंदुत्व व अयोध्येतील राममंदिरच्या मुद्द्यावरच आगामी निवडणुकीत मते मागणार आहे. शरद पवार आणि नारायण राणे यांच्या भेटीने शिवसेनेला धोकाच नाही. शिवसेनेच्या दबावामुळे चार लाख कोटी कर्जमाफी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संयमाने बोलावे; त्यांना अजून आठ महिने सरकार चालवायचे आहे. आगामी म्हणजे, २०१९ मध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी येथील चंद्रभागेच्या वाळवंटाची पाहणी केली. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शरयुनदीची महाआरती केली होती. त्याच धर्तीवर २४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरीत चंद्रभागेच्या आरतीचे नियोजन करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहरप्रमुख रवि मुळे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख आदी उपस्थित होते.