बुके विक्रेत्यांमध्ये हाणामारी; एकाच्या मानेत खुपसली कात्री

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बुके घेण्यासाठी आलेल्या गिऱ्हाईकाला बोलावण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत एकाच्या मानेत कात्री खुपसल्याप्रकरणी दोघांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार पार्क चौक येथील बुके स्टॉलवर घडला.

याबाबतचे वृत्त असे की, कपील मस्के (रा. थोबडे वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर) हे नेहमीप्रमाणे रविवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पार्क चौक येथील आपल्या बुके स्टॉलवर गिऱ्हाईकांच्या प्रतिक्षेत होता. दरम्यान, त्यांच्याकडे एक गिऱ्हाईक आले असता शेजारी असलेल्या बबनराव कामाने व अमोल शिंदे (दोघेही रा. लक्ष्मी चाळ, सोलापूर) या बुके स्टॉलधारकांनी त्या ग्राहकाला बोलावले. तेव्हा, आमच्या स्टॉलवर आलेल्या गिऱ्हाईकाला तुम्ही का बोलाविले? असा जाब कपील मस्के यांनी बबनराव कामाने व अमोल शिंदे यांना विचारला.

त्यावेळी गिऱ्हाईक काय तुझे घरचे आहेत का? असे म्हणत शिव्या देण्यास सुरुवात केली. आणि या वादावादीत कामाने व शिंदे या दोघांनी मिळून मस्के यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, अमोल शिंदे यांनी रागामध्ये येवून बुके स्टॉलवर असलेली केशरी रंगाची लोखंडी कात्री मस्के यांच्या मानेवर डाव्या बाजूस खुपसली. याप्रकरणी अमोल शिंदे आणि बबनरावे कामाने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार चौधरी हे करत आहेत.

Loading...
You might also like