बुलंदशहरमध्ये विषारी दारू पिल्याने 5 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री योगींकडून NSA लावण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदरबाद येथील जीतगढी गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे विषारी दारू पिल्याने 5 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्हाधिकारी रवींद्र कुमार (Collector Ravindra Kumar) यांनी सांगितले की, 16 जणांचे डायलिसीकरण केले जात आहे. या सर्वांनी गावातच विकली जाणारी दारू पिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एसएसपीने प्रभारी पदासह तीन पोलिसांना निलंबित केले आहे. पाच जणांच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी या घोटाळ्यातील दोषींवर रासुका (NSA) लावण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सुरुवातीच्या तपासाचा हवाला देत डीएम रवींद्र कुमार म्हणाले की, एका व्यक्तीने बाहेरून दारू आणली होती. मद्य दुकानांवर छापा टाकला जात आहे.

माहितीनुसार, जीतगढी येथील रहिवासी 35 वर्षीय सतीश, 40 वर्षीय कलुआ, रणजित तसेच 60 वर्षीय सुखपाल व इतर लोकांनी गावातीलच एका गावकऱ्यांकडून दारू खरेदी केली होती. गुरुवारी रात्री दारू प्यायल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जाऊन झोपले. मध्यरात्रीनंतर त्यांची प्रकृती बिघडली. यातील सतीश, कलूआ, रंजीत, सुखपाल आणि अन्य एकाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला, तर उर्वरित लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. या सर्वांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिस आणि प्रशासकीय पथक गावात पोहोचले आणि कुटुंबाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेण्यात व्यस्त आहेत. तर, अल्कोहोल विक्रेत्याचा अद्यापही शोध सुरु आहे.

दुसरीकडे, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलली आहेत. सीएम योगी यांनी जिल्हा प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर रासुका व गँगस्टर अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी जाऊन प्रत्येक पीडित व्यक्तीवर चांगल्या प्रकारे उपचारासोबत दोषीविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.