‘त्या’ पोलीस निरीक्षकची हत्या नाही तर आत्महत्या : भाजप आमदार

बुलंदशहर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बुलंदशहमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिस निरीक्षक सुबोध सिंह यांची हत्या झाली.मात्र, पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची हत्या झाली नसून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा खळबजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे.

लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून घेतली होती. काही लोकांना या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यावेळी हा हिंसेचा प्रकार घडला त्यावेळी सर्वच लोकांकडे हत्यारे नव्हती आणि पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांना केवळ एकच गोळी लागली होती. सुबोध कुमार जेव्हा गर्दीत अडकले तेव्हा त्यांनी बचावासाठी आपल्या खांद्यावर गोळी मारून घेण्याचा प्रयत्न केला परंतु, चुकुन त्यांच्या डोक्याला गोळी लागली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी गोहत्येच्या अफवेनंतर उसळलेल्या हिंसाचारात सुबोध सिंह यांची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये घडली होती. याप्रकरणात बजरंग दल आणि विहिंपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत २२ जणांना अटक केली आहे. बुलंदशहर या ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारामध्ये पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची हत्या झाली. तर आणखी एक तरुण मारला गेला होता. ३ डिसेंबरला झालेल्या या हिंसाचार प्रकरणी आत्तापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारातील गुन्हेगार शोधण्यासाठी विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे.