संतापजनक ! पोलिसाच्या अंगावर टिप्पर घालून चिरडलं, बुलढाण्यातील शेगाव तालुकयातील घटना

पोलिसनामा ऑनलाईन – अवैध रेती वाहतूक करणार्‍या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार्‍याला पोलिसाला चालकाने धडक देऊन गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर ठार झाल्याची खात्री करण्यासाठी टिप्पर चालकाने वाहन मागे घेऊन पोलिसाला पुन्हा चिरडल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात घडली आहे.

लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. याला पोलिस विभाग आणि महसूल विभागाच्या छुपा पाठींबा असल्याचे बोलले जात होते. सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती असतानाही बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आलेले आहे. यामध्ये पूर्णा नदीजवळ असलेल्या गावांमध्ये अवैध रेती वाहतूक करणारे वाहने रात्रभर रेतीची वाहतूक करत आहेत. बुधवारी पहाटे शेगाव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर एक विना नंबरचे टिप्पर रेती घेऊन खामगाव शहरकडे जात असल्याची माहिती जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांना मिळाली. त्यानंतर उमेश सिरसाट यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन मोटरसायकलने भरधाव वेगाने जाणार्‍या टिप्परचा पाठलाग केला.

टिप्पर हा माटरगाव या गावाच्या पुढे पोहोचलेला असताना पोलिसाने मोटर सायकल टिप्पर पुढे आडवी करून वाहन थांबवले. दरम्यान टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून पुढे नेले. घटना घडताच सोबत आलेला होमगार्ड घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलीस ठार झाला की नाही, याची खात्री करण्यासाठी टिप्पर चालकाने आपले वाहन मागे घेऊन पुन्हा रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेल्या त्या पोलिसाला चिरडले आणि यानंतर त्याने टिप्परसह खामगावकडे पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनासथळावर पोहचले असून सकाळपासून सदर वाहनाचा शोध सुरु आहे.