बुलढाणा : तत्कालीन सहायक आयुक्त चिमणकर यांच्यासह श्री शिवाजीराजे भोसले ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यावर एसीबीकडून FIR

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे तत्कालीन सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्यासह श्री शिवाजीराजे भोसले ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वतःच्या आर्थिक लाभासाठी शासनाच्या धनादेशाचा अपहारकरून बनावट दस्तऐवज तयारकरून शासनाची 4 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे तत्कालीन सहायक आयुक्त गणेश पांडुरंग चिमणकर, श्री शिवाजीराजे भोसले, ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक् किरण धंदर, सचिव शरद बावस्कर आणि निलेश शिंदे यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर व्ही शेळके यांनी तक्रार दिली आहे. भादवी कलम क13(1)(अ)ला.प्र.का.1988 सुधारीत-2018 सह कलम 468,471,420,120( ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तत्कालीन सहायक आयुक्त गणेश चिमणकर हे सध्या वाशीम येथे नेमणुकीस आहेत. ते पूर्वी बुलढाणा येथे कार्यरत होते. तर यातील श्री शिवाजीराजे भोसले ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि इतरांनी स्वतःचा आर्थिक लाभ होण्यासाठी गैर उद्देशाने गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचला. तसेच अन्यायाने संगनमत करून नियमबाह्य व अप्रमाणिकपणे शासनाची फसवणूक करून बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर शासनाची 4 लाख 11 हजार 894 रुपयांची फसवणूक केली असल्याचे तपासात समोर आले आहे.

एसीबीने 23 मार्च ते 12 जून 2020 या कालावधीत चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यातील निलेश शिंदे हा येथील गॅरेज चालक आहे. तर दोघे संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आहेत.

अमरावती परिक्षेत्र लाच लुचपत प्रतिबंधक विभाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायसपी शंकर शेळके, एएसआय नंदकिशोर परळकर, पोलिस नाईक विनोद अवगळे, राहुल व्यवहारे, नाविद शेख यांच्या पथकाने केली आहे.