‘त्या’ वृध्दाचा मृत्यू ‘कोरोना’मुळं नाहीच, मात्र बुलढाण्यात ‘शुकशुकाट’ !

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनासदृष्य लक्षणे आढळून आलेल्या एका वृद्ध रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, या वृद्धाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचा अहवाल आज (रविवार) प्राप्त झाला आहे. अहवालावरून या रुग्णाला कोरोना झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृद्धाचा नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल कोरोना बाबत निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे
आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी केले आहे.

शनिवारी सौदी अरेबियातून आलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा वृद्ध चिखली तालुक्यातील असून ते शुक्रवारी सौदी अरेबिया येथून परत आले होते. ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यामुळे त्यांना आधी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्यांना शनिवारी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

या वृद्ध व्यक्तीला पूर्वीपासूनच मधुमेह व इतर आजार असल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणी अहवाल आल्यानंतरच या रुग्णाला कोरोना झाला आहे की नाही हे समजेल असे जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केले होते. आज या रुग्णाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरनाची लागन झाली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले.