एक दिवसाच्या ‘आमदार’ सविता पानकर यांचं निधन

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – एक दिवसाच्या आमदार सविता पानकर यांचं आज निधन झालं आहे. (Savita Pankar Died) सविता पानकर यांनी लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न पाहिलं होतं ते आता अपूर्ण राहील आहे. सविता कर्करोगाने ( Cancer) ग्रस्त होत्या. अखेर त्यांची कर्करोगाशी चाललेली झुंज अयशस्वी ठरली. सविता पानकर यांची उच्च शिक्षण घेऊन आपल्या प्रबळ पंखांनी भरारी घेऊन जनतेची सेवा करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. त्यांना महिला दिनी एक दिवसाचे आमदार बनवण्यात आले होते. अखेर सविता यांचा कर्करोगाने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या तरुणीचे उंच शिखर गाठून लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न अपूर्णच राहिले.

सविताच्या कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाल्याने वडील-आजोबांनी मोलमजुरी करुन त्यांचे पालनपोषण केलं होत. सविता यांनी मोठ्या जिद्दीने अभ्यास करत परिस्थिती बदलण्याचा ध्यास मनाशी धरुन बीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या दरम्यान तिला कर्करोगाने ग्रासले त्यामुळे तिचे अधिकारी बनण्याची आणि लाल दिव्याच्या गाडीची इच्छा अपूर्णच राहिली. समाजात राहून कॅन्सर ( Cancer) ग्रस्तासाठी काम करण्याची तिची इच्छा होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. अखेर सविता यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली.

सविता यांना काही क्षणाचा का होईना आनंद देण्याचा प्रयत्न बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad) यांच्याकडून करण्यात आला होता. संजय गायकवाड यांनी 8 मार्च महिला दिनी सविताला एक दिवसाचं आमदार बनवलं होतं. मात्र, या तरुणीची लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याची इच्छा अपूर्णच राहिली. सविता यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.