दुर्दैवी ! दोन भाच्यांसह मामाचा धरणात बुडून मृत्यू, बुलडाणा जिल्ह्यातील घटना

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या मामा आणि दोन भाच्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिध्द येथील लघु प्रकल्पात मंगळवारी (दि. 18) सकाळी 7 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. यामुळे धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली आहे.

विनायक गाडगे (वय 27), तेजस गाडगे (वय 18 दोघेही रा. धानोरा महासिध्द ) आणि त्यांचा मामा नामदेव वानखेडे (वय 43 रा. दाताळा) असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात नोकरीला असलेला विनायक गाडगे लॉकडाऊनमुळे सोमवारी (दि. 17) धानोरा येथे घरी आला होता. त्याच्या सोबत त्याच्या काकाचा मुलगा तेजस हा देखील होता. तर त्यांचे मामा नामदेव वानखडे हे दाताळा येथून आपल्या बहिणीला लग्न समारंभासाठी न्यायला धानोरा येथे आले होते. मामा आणि भाचे हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले होते. मात्र हे तिघेही रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातलगांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यानंतर पोलीस पाटलांनी घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली. धरण परिसरात शोध घेताना त्यांचे कपडे आणि मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळले. मात्र रात्र झाल्याने अंधारात शोध घेता आला नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये तिघाचेही मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. यानंतर पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.